अमरावती जिल्ह्याचा इतिहास

१८६४ मध्ये अमरावती मधून यवतमाळ जिल्हा वेगळा करण्यात आला.१९०३ मध्ये निजामाने वऱ्हाड ब्रिटिश भारत सरकारकडे कायमस्वरूपी सुपूर्द केला.(ईस्ट इंडिया कंपनीला तो काही कालावधीसाठीच देण्यात आला होता.) १९०३ मध्ये वऱ्हाड मध्यप्रांताला जोडण्यात आला. आणि मध्यप्रांत व बेरार असा मोठा प्रांत निर्माण करण्यात आला. तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड कर्झन याने वऱ्हाड मुंबई प्रांतास जोडण्यास नकार दिला. मराठी भाषिकांमध्ये प्रांतिक फूट पाडणे हा त्याचा हेतू होता. १९५६ मधील राज्य पुनर्रचनेदरम्यान अमरावती जिल्ह्यासहित विदर्भातील सर्व जिल्हे तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले. १९६० मध्ये महाराष्ट्र व गुजरात वेगळा झाल्यावर अमरावती जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला. अमरावती जिल्हा दख्खनच्या पठारावर पूर्णपणे स्थानबद्ध आहे.

प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असं सांगतात.

अमरावती जिल्हा हा महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३.९८ टक्के क्षेत्र या जिल्हाने व्यापलेले आहे. अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे. विदर्भातील महत्वाचा, शैक्षणिक दृष्ट्या प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. सामाजिक क्षेत्रामध्ये या जिल्ह्याचं नाव खूपच अग्रेसर आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. पंजाबराव देशमुख इत्यादी महत्वाच्या व्यक्ती या जिल्ह्यात होऊन गेल्या आहेत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. अमरावती जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले चांदूरबाजार तहसिलातील माधान हे गाव श्री गुलाबराव महाराजांची कर्मभूमी आहे. १९४६ साली डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अमरावतीजवळ तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामाची स्थापना केली. अमरावती येथील अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी मंदिर प्रवेश चळवळ सुरू केली. १९३२ साली त्यांनी अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय व शिवाजी शिक्षण समितीची स्थापना केली. शिवाजी शिक्षण समिती आज विदर्भातील अग्रणी शिक्षण संस्था आहे. १८९७ चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन अमरावती येथे भरले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष सी. शंकरन नायर हे होते.

अमरावती जिल्ह्याला अकोला,यवतमाळ, वर्धा , अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांच्या सीमा लागल्या आहेत.अमरावती जिल्ह्याची सर्वात जास्त सीमा मध्यप्रदेश या राज्याला लागली आहे. अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा सीमावर्ती प्रदेश आहे. या जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी हे तालुके संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहेत. भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातील अग्रगण्य संस्था आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होणारे दादासाहेब खापर्डे , वीर वामनराव जोशी याच जिल्ह्यातील होते.